बँकेची प्रगती ही पूर्णतया तुमच्या समाधानाशी जोडलेली आहे. त्यासाठी आमच्या बँकिंग प्रणाली तसेच प्रक्रिया यात सातत्याने सुधारणा करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. हे करत असताना नियमांचे आणि बंधनांचे पालन आम्ही काटेकोरपणे करतो. आरबीआय, राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य सहकारी बँका यांनी निश्चित केलेली तत्त्वे पाळत उच्च प्रतीची कॉम्प्युटर आधारित डिजिटल बँकिंग सेवा आम्ही देतो. हे करत असताना आम्ही कुठेही सामाजिक आणि जन-केंद्रित मूल्यांशी तडजोड करत नाही.
उत्तम नेतृत्व लाभलेल्या एलडीसीसीने गेल्या चार दशकांत प्रगतीचे नवनवीन विक्रम पार केले आहेत. जिल्हा बँकांमध्ये आमचा नंबर अव्वल असून आमचे आर्थिक स्थान मजबूत आहे. ग्रामीण विकासाला आम्ही ठळकपणे हातभार लावत आहोत. आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला दृढ पाठिंबा यामुळेच आम्ही इथवर पोहोचलो आहोत, ही जाणीव आम्हाला आहे.
समाजातील सर्व श्रेणींना सेवा बहाल करणे आम्हाला शक्य झाले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. शेतकऱ्यांचे भले व्हावे यासाठी आम्ही बांधील आहोत आणि त्यासाठी आम्ही व्याज-मुक्त कृषी कर्ज पुरवठा करतो. महत्त्वाच्या पिकांसाठी कर्ज मर्यादा वाढवतो. यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत संलग्न साखर कारखान्यांना आधार देतो. यायोगे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी, तसंच नवोद्योजकांनी पुढे यावे, रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात हा आमचा प्रयास आहे.
डिजिटल युगात वाटचाल सुरू असताना एलडीसीसी बँक आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत डिजिटल होत आहे. तुमचा बँकिंग अनुभव अधिक सहज सुलभ होण्यासाठी तुम्हाला मोबाईल बँकिंग, यूपीआय हस्तांतरण आणि आयएमपीएससारख्या सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सद्य आर्थिक वर्षात, न्यूनतम व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देत विविध योजनांच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला आम्ही नेहमीप्रमाणे अग्रक्रम देत आहोत. आमच्या अथक प्रयत्नांमुळे आमची कर्ज वसुली ९७% इतकी असून आर्थिक सुज्ञता आणि जबाबदारी पालन या क्षेत्रात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.
वैधानिक ऑडीटमध्ये एलडीसीसी बँकेने सातत्याने ‘अ’ दर्जा राखला आहे, हे आपणास सांगताना मला अभिमान वाटत आहे. विविध श्रेणींमध्ये बँकेला आजवर ३९ पारितोषिके प्राप्त झाली आहेत. सर्वोत्तम होण्याप्रति आमची जी बांधिलकी आहे, त्यासाठी ही पारितोषिके अधिक प्रेरणादायी ठरतात.
विश्वसाथीदरम्यान आम्ही ग्राहकाभिमुख सेवेवर भर ठेवला होता. त्या वेळेस ग्रामीण भागात आम्ही ‘बँक तुमच्या दारी’ या धर्तीवर सेवा सुरू केली. शेतकऱ्यांना पिकविमा भरणा आणि निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्राप्त करणे सोयीचे झाले. एटीएमच्या माध्यमातून आम्ही २४x७ सेवा देत आहोतच. शिवाय आमच्या कल्पक एटीएम व्हॅन/ब्रांच ऑन व्हील्समुळे आम्ही ग्रामीण भागात घरोघरी पोहोचत आहोत.
आमचे ग्राहक आणि भागधारक या सगळ्यांनी सातत्याने आम्हाला पाठिंबा दिला, आमच्यावर विश्वास टाकला. बँक कर्मचारी-अधिकारी यांच्या समर्पित टीमने तो विश्वास सार्थकी ठरवला. या सगळ्यांप्रति मी मनोमन कृतज्ञता व्यक्त करतो. असेच संघटीतरीत्या हा रथ प्रगतीपथावर पुढे नेऊ या. अधिक सकारात्मकता निर्माण करू या.